विमानतळावर तस्करीचे ७० लाखांचे सोने जप्त

मुंबई विमानतळावरील हवाई गुप्तचर विभाग पथकाने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांत परदेशातून तस्करी करून आणलेले ७० लाख रुपये किमतीचे अडीच किलो सोने जप्त केले आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, प्रसाधनगृहात एका बॉक्समध्ये सोन्याचे बार लपवून ठेवले होते, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दुबईहून इमिरेट्स फ्लाईट ईके-५०८ने आलेल्या मोहम्मदअली किकपुरम मोहम्मद (वय ४१) याने प्लॅस्टिकमध्ये प्रत्येकी ११६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बार लपवून ठेवले होते. हे बार वरून काळ्या रंगाची पट्टी चिकटवून ते विमानतळावरील पुरुष प्रधासनगृहात एका बाजूला ठेवलेले होते. मात्र मोहम्मदअलीच्या संशयास्पद हालचालींमुळे त्याची चौकशी केली. त्यात हा प्रकार उघडकीस आला. प्रसाधनगृहाच्या भिंतीवर पाण्याच्या नळाच्या बाजूला ही पाकिटे ठेवून तो दरवाजा लॉक करीत असे. अधिकाऱ्यांनी प्लंबरकडून दरवाजा उघडून दोन सोन्याच्या बारची पाकिटे जप्त केली. त्याचे एकूण वजन एक किलो १६ तोळे ५ ग्रॅम इतके असून, त्याची किंमत ३४ लाख ३७ हजार एवढी आहे. मोहम्मद हा मूळचा केरळातील कासरगाव येथील असून, तो दुबईमध्ये एका कंपनीत विक्री प्रतिनिधी म्हणून काम करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुसऱ्या घटनेत एअर इंडियाच्या एएल-९८४ क्रमांकाच्या फ्लाइटमधून दुबईहून आलेल्या विमानातून आयात केलेली ३४ लाख ३७ हजार रुपये किमतीची सोन्याची बिस्कीटेही जप्त केली. एका पांढऱ्या रंगाच्या टेपमध्ये गुंडाळून ती शौचालयात वापरल्या जाणाऱ्या टिश्यूपेपरच्या बॉक्सच्या खाली चिकटवून ठेवण्यात आली होती. या मालाची जबाबदारी कोणीही स्वीकारली नसल्याने आरोपीचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *