धाराशिव पोलीस भरतीमधील बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट उघडकीस आणणारा बीडचा तरुण वैभव चव्हाण याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील इमामपूर परिसरात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. वैभवच्या अंगावर मारहाणीचे वळ आणि पायाला जखमा असल्याने नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
मृत्यूपूर्वी वैभवने एका ऑडिओ क्लिपद्वारे आपल्याला धमक्या येत असल्याचे आणि याला कुराश संघटना जबाबदार असेल असे मित्राला सांगितले होते. समोर आलेल्या ऑडिओ मध्ये कुराश संघटनेच्या अध्यक्षासह महाराष्ट्रातील सर्वच पदाधिकाऱ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे वैभवची हत्या करून आत्महत्या केल्याचे भासवण्यात आल्याचा आरोपी पीडित कुटुंबाने केला आहे. या ऑडिओमध्ये अनेक जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या नावाचा देखील उल्लेख आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान बीड ग्रामीण पोलिसात सध्या तरी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
माझ्या भावाची आत्महत्या नसून त्याचा घात झाल्याचा आरोप भावाने केला आहे. दरम्यान या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी त्याने केली आहे. वैभव याच्या मोबाईलमधील डिलीट करण्यात आलेला डेटा रिकव्हर करावा, शिवाय सीडीआर काढावा अशी मागणीही कुटुंबाने केली आहे.
