माजी खासदार शिवाजीराव पाटील यांचे निधन

माजी खासदार शिवाजीराव पाटील यांचे निधन

दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे वडील आणि धुळ्याचे माजी खासदार शिवाजीराव पाटील यांचे आज पहाटे मुंबईत निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री, आमदार राहिलेल्या शिवाजीराव पाटील एक टर्म राज्यसभेचे खासदारही होते. 2013 मध्ये त्यांना पद्म भूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. शिवाजीराव पाटील तरुण वयातच देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले.
सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असलेले शिवाजीराव पाटील पुढे राजकारणात आले. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी या राजकीय पक्षाशी ते संबंधित होते. 1960 ते 1967 या काळात ते महाराष्ट्र विधानपरिषदेतून आमदार होते. 1967 ते 1980 या काळात विधानसभेचे आमदार होते. 1967, 1972 आणि 1978 अशा सलग तीन निवडणूका त्यांनी जिंकल्या.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात त्यांनी राज्यात विविध खात्याचे मंत्रिपदही भूषवले. साखर क्षेत्रातील सहकारी चळवळीतही ते सक्रीय होते. 1992 ते 1998 अशी एक टर्म ते राज्यसभेचे खासदार होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *