भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण होणार, हे ठरवणाऱ्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद विरुद्ध संयुक्त पुरोगामी आघाडीच्या मीरा कुमार यांच्यात राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होत आहे. यामध्ये रामनाथ कोविंद यांचे पारडे खूपच जड मानले जात आहे. रामनाथ कोविंद यांना असलेला पाठिंबा पाहता, त्यांचा विजय निश्चित मानला जातो आहे.
भाजप, भाजपचे मित्रपक्ष यांच्यासह केंद्र सरकारमध्ये सहभागी नसलेले अनेक पक्ष यांनी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रामनाथ कोविंद यांच्या पारड्यात सध्याच्या घडीला जवळपास दोन तृतीयांश मते आहेत. त्यामुळे रामनाथ कोविंद देशाचे चौदावे राष्ट्रपती होतील, याबद्दल भाजपला विश्वास आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच रामनाथ कोविंद यांचे अभिनंदन केले आहे. रामनाथ कोविंद यांनी उमेदवारी भरताना भाजपकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री अशी संपूर्ण फौज कोविंद अर्ज भरत असताना उपस्थित होती.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती नेमकी भाजपच्या उलट पाहायला मिळते आहे. उमेदवार निवडीपासूनच काँग्रेस पक्ष गोंधळलेला पाहायला मिळाला. भाजपने दलित कार्ड खेळल्यावर काँग्रेसची फरफट झाली. भाजपमुळेच काँग्रेसलादेखील मीरा कुमार यांच्या रुपात दलित उमेदवार द्यावा लागला. मात्र उमेदवार निवडीला उशीर झाल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसची साथ सोडली. यानंतर विरोधकांमध्ये एकी नसल्याचा संदेश देशभरात गेला. काँग्रेसकडे मतांचे पाठबळ नसल्याने मीरा कुमार या केवळ उमेदवार म्हणून राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उतरणार आहेत. मीरा कुमार यांच्याकडे पुरेसा पाठिंबा नसल्याने ‘लोकप्रतिनिधींना विवेकाचा वापर करुन मतदान करावे,’ असे भावनिक आवाहन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून करण्यात आले आहे.
