भिरा येथील कुंडलिका नदीच्या उगमाशेजारी असणाऱ्या देवकुंड धबधब्यावर रविवारी ९ जुलै रोजी दुपारी अखिल चौधरी हा भारतीय सेनेतील तरुण अधिकारी व विपीन पाठक हे पुण्यातून आलेले दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन बेपत्ता झाले. सोमवारी विपीन पाठक याचा मृतदेह सापडला असून अखिलचा शोध सुरू आहे.
विपीन पाठक (२५, रा. एव्हेन्यू भलेवाडी, जि. पुणे) व अखिल चौधरी हे दोघे दोन भिन्न गटात आपापल्या मित्र-सहकाऱ्यांसह रविवारी ९ जुलै रोजी माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधब्यावर फिरण्यासाठी आले होते. विपीन पाठक हा बेपत्ता झाल्याची माहिती नैना जैसवाल (२३, रा. पुणे) हिने पोलिसांना दिली. नैना ही पाठक याच्या कंपनीतील सहकारी आहे. विपीन पाण्याच्या प्रवाहात वाहत गेल्यानंतर त्याचे मित्र व स्थानिक तसेच पोलिसांनी सर्वत्र शोध सुरू के ला. मात्र, रविवारी विपीनचा शोध लागला नाही. १० जुलैला दुपारी पावणेतीनच्या सुमारास देवकुंड धबधब्याजवळ विपीनचा मृतदेह सापडला.
तर अखिल चौधरी हा बेपत्ता झाल्याची माहिती सागर खरे (२२, रा. दापोडी, पुणे) याने दिली. अखिल हा पुणे येथून बारा जणांसह देवकुंडवर आला होता. तो सैन्यात अधिकारी आहे. सर्व मित्र देवकुंड धबधब्यावर कंबरभर पाण्यात पोहत असताना अखिल चौधरी यास पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात ओढला जाऊन बुडाला. अखिलचा शोध अद्याप लागला नाही. अखिलच्या शोधासाठी नॅशनल डिफेन्स फोर्सच्या दोन तुकड्या, भारतीय सेनादलाची एक तुकडी, नाविक दलाची एक तुकडी, रॅपिड फोर्स व ५० कर्मचारी सोमवारी उशिरापर्यंत कार्यरत होत्या.