नागपूर बोट दुर्घटनेतील सर्व मृतदेह बाहेर काढण्यात यश

नागपूरमधील वेणा जलाशयात बोट उलटल्याने बुडालेल्या आठही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सर्व मृतदेह हाती आल्यानंतर अखेर बचावकार्य थांबवण्यात आलं आहे. रविवारी सेल्फी काढण्याच्या नादात बोट उलटल्याने 11 तरुण जलाशयात बुडाले होते. यातील तीन तरुणांना वाचवण्यात यश आलं होतं. यामध्ये दोन नाविकांसह एक पर्यटक तरुणाचा समावेश होता.
बोट बुडाल्याची माहिती मिळताच शोधकार्य सुरु करण्यात आलं होतं. राहुल जाधव, अंकीत भोस्कर, परेश कटीके, रोशन खांदारे आणि अक्षय खांदारे या पाच जणांचे मृतदेह सापडले होते. मात्र उर्वरित तीन मृतदेहांचा शोध सुरु होता. अतुल भोयर, पंकज डोईफोडे आणि प्रतिक आमडे हे तीन जण बेपत्ता होते. अखेर त्यांचेही मृतदेह हाती लागले आहेत. सर्व मृतदेह सापडल्यानंतर रविवारी रात्रीपासून सुरु करण्यात आलेलं बचावकार्य थांबवण्यात आलं आहे.
दरम्यान, ही दुर्घटना घडण्यापूर्वी या तरुणांनी फेसबुक लाईव्ह केले होते. सहलीचा कसा आनंद घेत आहेत याची माहिती बोटीतील हे तरुण फेसबुक लाईव्हद्वारे आपल्या मित्रांना सांगत होते.  यावेळी काही जणांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. शिवाय, एवढे जण एका बोटीत कसे बसले आहात, असा प्रश्न उपस्थित करत भीतीदेखील व्यक्त केली होती. काही वेळानं ही बोट उलटून दुर्घटना घडली ज्यात 11 जण बुडाले. यातील तीन जणांना वाचवण्यात यश आले होते. रविवारी (9 जुलै) संध्याकाळी ही दुर्घटना घडल्यानं अंधारामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. त्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *