ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रातील डोनीच्या जंगलात मोठय़ा वाघासोबत झालेल्या झुंजीत दोन बछडय़ांचा मृत्यू झाला. मूल वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या व्याघ्र संवर्धन व संरक्षणाकडे झालेल्या दुर्लक्षातून ही घटना घडल्याची चर्चा वन खात्यात आहे.
या बछडय़ांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा. घटनास्थळी जमा झालेले रक्त आणि मृत बछडय़ांना ओढत नेल्याची चिन्हे दिसून येत होती. या बछडय़ांना एखाद्या वाघाने मारल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या मृत बछडय़ांचे वय अंदाजे आठ ते नऊ महिने असावे, अशी माहिती ताडोबा बफरचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांनी दिली.
बछडय़ांच्या डोक्याच्या कवटीवर दाताच्या मोठय़ा जखमा दिसून आल्या. त्यामुळे बछडय़ांचा मृत्यू हा मोठय़ा वाघाच्या हल्ल्यात झाल्याचा अंदाज आहे. सहा ते आठ महिन्यांपासून केसलाघाट येथील वन नर्सरीजवळ वाघीण व तिच्या या दोन बछडय़ांचे वास्तव्य होते. मूल मार्गाने ये-जा करणाऱ्या अनेकांना या वाघीण व बछडय़ांनी दर्शन दिले. तेव्हाच त्यांच्यावर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने लक्ष ठेवायला हवे होते, अशी कुजबुज आता होत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जे.बोबडे एसटीएफचे प्रभारी असून त्यांच्या ताब्यात ३६ सुरक्षारक्षकांचे पथक आहे. परंतु त्यांचे याकडे कमालीचे दुर्लक्ष झाले. ते मूल येथे मुख्यालयी राहण्याऐवजी चंद्रपूरला वास्तव्याला असतात. त्यांचा अर्धा वेळ चंद्रपूर-मूल येण्याजाण्यात जातो, तेव्हा ते व्याघ्र संरक्षण व संवर्धन कसे करणार असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. या बछडय़ांकडे सुरुवातीपासून योग्य लक्ष दिले असते तर त्यांचा जीव वाचविता आला असता, अशी प्रतिक्रिया वन्यजीवांसाठी काम करणारे उमेश झिरे यांनी बोलताना व्यक्त केली.
विशेष म्हणजे बछडय़ांच्या मृत्यूची बातमी वन अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांपासून लपवून ठेवली. वन खात्यातील काही खास अधिकारी सोडले तर इतर कुणालाही याची माहिती देण्यात आली नव्हती. रात्री उशिरा काही जणांना ही माहिती देऊन मंगळवारी घटनास्थळी केवळ शवविच्छेदनासाठी बोलाविले होते. याचाच अर्थ वन विभाग जंगलातील अनेक घडामोडी माध्यमांपासून लपवून ठेवत असल्याचे स्पष्ट झाले.
सहा महिन्यांत ११ वाघांचा मृत्यू
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा जिल्हा असलेल्या चंद्रपुरात १ जानेवारी ते ३ जुलै या सहा महिन्यांत ११ वाघांचा मृत्यू झालेला आहे. ताडोबा बफर आणि कोअर क्षेत्रात वाघांचे मृत्यू सातत्याने होत आहेत. त्यामुळे व्याघ्र संवर्धन व संरक्षक या दोन्हीकडे वन खात्याचे कमालीचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे दोन महिन्यात चार बछडय़ांचा मृत्यू झाला आहे. यातील एक बछडा सिंदेवाही परिसरात चिखलात फसून तर दुसरा चिमूर वनपरिक्षेत्रात मृत्युमुखी पडला. त्यानंतर आता डोनीच्या जंगलात पुन्हा दोन छाव्यांचा मृत्यू झाल्याने वाघीण व छाव्याकडे योग्य पद्धतीने लक्ष दिले जात नसल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
