प्रेयसीची अवेळी भेट युवकाच्या आली अंगाशी

रात्रीच्या वेळी अंधारात प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या प्रियकराला चोर समजून परिसरातील नागरिकांनी यथेच्छ धुतला. या वेळी आपण खरे सांगणार कसे, हा प्रश्‍न त्याच्यासमोर निर्माण झाल्याने प्रकरण ताणले गेले. अखेर त्याने आपण प्रेयसीच्या भेटीसाठी आलो होतो, असे सांगितल्यानंतर त्याची सुटका झाली.

हा प्रकार शहराजवळील एका कॉलनीत घडला. शहरात राहणारा एक युवक रात्री साडेअकराच्या सुमारास आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी वसाहतीच्या दिशेने गेला. त्याने नेलेली दुचाकी वसाहतीत असलेल्या मैदानात ठेवली. तो आडवाटेने प्रेयसीच्या घराच्या दिशेने निघाला. तो चोर पावलांनी जात असल्याचे लक्षात येताच त्याला पाहणाऱ्यांना तो चोरी करण्यासाठी आला असेल, अशी शक्‍यता आली. नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि चोर समजून फटके घातले; मात्र हा प्रकार सुरू असताना जमलेल्या काही लोकांनी त्याला ओळखले आणि त्यानंतर त्याची चौकशी केली. या वेळी मनात नसतानाही त्याने आपण प्रेयसीला भेटण्यासाठी आलो होतो, असे कबुल केले; मात्र त्या गर्दीत प्रेयसीचा बाप असल्याने त्याला दुसऱ्याच प्रश्‍नाला सामोरे जावे लागले. अखेर मध्यस्थी करत त्याला काही नागरिकांनी पुन्हा येथे असा रात्रीचा फिरू नको, असे सांगून घरचा रस्ता दाखविला; मात्र शहरात या प्रकाराची चर्चा जोरदार सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *