बॉलिवूड अभिनेत्री व खासदार हेमामालिनी हिच्या अपघात प्रकरणात दुर्दैवी मृत्यू झालेल्या चार वर्षाच्या सोनम खंडेलवाल हिचा जीव वाचू शकला असता, अशी खंत तिचे वडील हनुमान खंडेलवाल यांनी व्यक्त केली आहे.
हा अपघात झाल्यानंतर त्याच रस्त्याने जाणा-या एका डॉक्टरने हेमामालिनीला आपल्या गाडीतून जयपूर येथील रुग्णालयात नेले, मात्र त्याच तत्परतेने जर माझ्याही मुलीला रुग्णालयात नेले असते तर कदाचित तिचा जीव वाचू शकला असता, असे खंडेलवाल म्हणाले.
‘मी माझी पत्नी, दोन मुले व मेहुणीसह जयपूरला खरेदीसाठी गेलो होतो. परत येताना आम्ही जयपूर आग्रा रस्त्यावर लालसोटकडे वळलो. मात्र त्याच वेळी समोरून येणा-या भरधाव मर्सिडीझ गाडीने आमच्या गाडीला जोरदार धडक दिली. यावेळी माझी मुलगी चिन्नी ही समोरच्या सीटवर तिच्या आईच्या मांडीवर झोपली होती. पण त्या अपघातानंतर ती उठलीच नाही’, असे सांगताना हनुमान खंडेलवाल यांना अश्रू अनावर झाले.
‘ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी बघ्यांनी केवळ हेमामालिनीलाच मदत केली. कदाचित त्यांच्या वलयामुळेच हे झाले असावे, पण त्यांना जयपूरच्या फोर्टीस रुग्णालयात नेण्यात आले आणि आम्हाला मात्र दौसा येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले’, असेही हनुमान खंडेलवाल हताशपणे म्हणाले.
या अपघातानंतर निष्काळजीपणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल हेमामालिनी यांच्या मर्सिडीझच्या चालकाला अटक करण्यात आली आहे.

