ऑक्सिजन पुरवठा बंद पडल्याने दोन लहान मुलांसह ११ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील इंदूरच्या महाराजा यशवंतराव (एम.वाय) रुग्णालयात घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री ३ ते ४ च्या दरम्यान रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा १५ मिनिटांसाठी खंडित झाल्याने ११ रुग्णांना जीव गमवावा लागला.
या दुर्दैवी घटनेमुळे संताप व्यक्त होत असतानाच रुग्णालयाचे विभागीय आयुक्त संजय दुबे यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगत निष्काळजीपणा झाल्याचा वा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. एवढेच नव्हे तर ‘एवढ्या मोठ्या रुग्णालयात अशा घटना होतच असतात’ असे असंवेदनशील वक्तव्यही त्यांनी केले. याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल असे त्यांनी नमूद केले.
महत्वाचे म्हणजे या घटनेची माहिती कळल्यानंतर पत्रकार वृत्तांकनासाठी रुग्णालयात पोचले तेव्हा ऑक्सिजन पुरवठ्याची नोंद ठेवण्यात येणारी फाईल आणि रुग्णालयातील मृतांची माहितीची कागदपत्रे, हे सर्व गायब करण्यात आले होते. सर्व आलबेल असल्याचा दावा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी कागदपत्रे दाखवण्यास मात्र नकार दिला.
