येत्या रविवारी तुम्ही मेट्रोसफारीचा विचार करत असला, तर रद्द करावा लागेल. कारण सकाळी ८:३० ते दुपारी ४ असा तब्बल साडेसात तासांचा जम्बो ब्लॉक वर्सोवा थे घाटकोपर मेट्रो मार्गावर घेण्यात येणार असल्याचे ‘मुंबई मेट्रो वन प्रायवेट लिमिटेड’द्वारे (एमएमओपीएल) सांगण्यात आले.
मेट्रोची सध्याची वेगमर्यादा वाढवून ८० कि.मी. प्रती तासावर नेण्याचे प्रस्तावित आहे. या वेगमर्यादेची चाचणी मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांद्वारे घेण्यात येणार आहे. वेगमर्यादेला हिरवा कंदील मिळाल्यास मेट्रोचा प्रवास अधीक वेगवान होईल.
वर्सोवा ते घाटकोपर असा ११.४ कि.मी मार्गावरील प्रवास करण्यासाठी सध्या २५ मिनिटे लागतात. मेट्रो ५० कि.मी प्रती तास वेगावर धावते. मेट्रोचा वेग ८० कि.मी. प्रती तासावर नेण्याचे प्रस्तावित आहे. प्रस्तावित वेगमर्यादेच्या मेट्रोच्या चाचणी फे-या रविवारी सकाळी ८:३० ते दुपारी ४ या वेळेत घेण्यात येतील. वेगमर्यादा वाढवण्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने एमएमओपीएलने काय उपाययोजना केल्या आहेत याचा आढावाही यावेळी घेण्यात येईल.
प्रस्तावित वेगमर्यादेला हिरवा कंदील मिळाल्यास प्रवाशांच्या वेळेत निश्चितच काही प्रमाणात बचत होईल, असे एमएमओपीएलच्या प्रवक्तयाने सांगितले. मेट्रो सेवा सुरु झाल्यापासून ते आतापर्यंत कधीही इतक्या मोठय़ा प्रमाणात सेवा बंद ठेवण्यात आली नव्हती. मेट्रो सेवा सुरु झाल्यानंत आठ महिन्यांनी एमएमओपीएलद्वारे मेट्रो मार्गावर पहिला मेगा ब्लॉक घेण्यात आला होता.

