रुट कॅनल करताना चिमुरडीचा मृत्यू

रुट कॅनल करताना चिमुरडीचा मृत्यू

दात किडल्यामुळे उपचारांसाठी दवाखान्यात नेलेल्या तीन वर्षीय चिमुरडीचा ‘रुट कॅनल’ करताना मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी कोथरूडमध्ये घडली. कोथरूड पोलिसांनी या प्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सानवी निरंजन रेवतकर (वय ३) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. डॉ. अंकुर कुलकर्णी (रा. राहुलनगर, कोथरूड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. निरंजन रेवतकर (वय ३५, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक जगन्नाथ मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेवतकर आणि त्यांची पत्नी सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, हिंजवडी येथील एका कंपनीमध्ये ते नोकरी करतात. त्यांची मुलगी सानवीच्या चारही दाढा आणि एक दात किडला होता. तिच्या दातांवर उपचार करण्यासाठी कुलकर्णी यांच्या फॅमिली डेंटल केअर दवाखान्यात तिला नेले होते.
सानवीवर २६ जूनपासून उपचारांना सुरुवात केली होती. २६ जून रोजी तिच्या तीन दाढांमध्ये सिमेंट भरण्यात आले होते. तर २७ तारखेला दातावर उपचार केले होते.तिचे २९ तारखेला रुट कॅनल करण्यात येणार होते. त्यानुसार पालकांनी तिला कुलकर्णी यांच्या दवाखान्यात नेले. तिला कुलकर्णी यांनी भूल दिली. त्यासाठी लिग्नोक्स हे इंजेक्शन दिले होते. रुट कॅनलची प्रक्रिया सुरु केल्यानंतर हायड्रोजन पॅरॉक्साईडच्या सहाय्याने दातांमधील घाण काढत असतानाच सानवीला खोकला आला.
डॉक्टरांनी तिला उचलून घ्यायला निरंजन यांना सांगितले. त्यानुसार मुलीला उचलल्यानंतर तिने लघवी केली. वडीलांच्या खांद्यावर मान टाकत तिने डोळे पांढरे केले. निरंजन यांनी तातडीने तिला शेजारीच असलेल्या डॉक्टर सुमीत आणि स्वप्ना बिटकर यांच्या लहान मुलांच्या दवाखान्यात नेले. तेथे तिला कृत्रिम श्‍वासोच्छ्वास देण्यात आला. परंतु तिची प्रकृती बिघडल्यामुळे एरंडवण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पालकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कुलकर्णी यांच्याविरुद्ध हलगर्जीपणाचा तसेच सानवीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, व्हिसेरा न्यायवैद्यक प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आल्याचे सहायक निरीक्षक मोरे यांनी सांगितले. कायदेशीर सल्ला घेऊन डॉक्टर कुलकर्णी यांना अटक करण्यात येणार आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जगन्नाथ मोरे तपास करीत आहेत.
(प्रतिनिधी)
——————
सानवीवरील उपचार करताना नेहमीची प्रक्रिया पार पाडलेली आहे. मी गेली सहा वर्षे लहान मुलांना हाताळतो आहे. त्यांना होणार्‍या वेदना कमी करण्याचा मी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केला आहे. घटनेच्या दिवशी सावनी ३0 ते ४0 मिनिटे स्वस्थ बसून होती. परंतु नंतर तिला त्रास होऊ लागला होता. तिला अस्वस्थ वाटू लागल्यावर तातडीने शेजारच्या दवाखान्यात नेण्यात आले होते. मी शेवटपर्यंत पेशंटसोबत होतो. लाखांतून एखादी अशी केस घडते. मी तिच्यासाठी डॉक्टर म्हणून १00 टक्के प्रामाणिक प्रयत्न केले. रेवतकर कुटुंबीयांच्या दु:खामध्ये मी सहभागी आहे. तिच्या मृत्यूचे मलाही मोठे दु:ख झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *