महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील शेतकरी आंदोलनाचा वणवा आता गुजरातमध्येही पसरल्याचे दिसते. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांना सोमवारी त्याचा अनुभव आला. गुजरातच्या अमरेली येथे काल संध्याकाळी स्मृती इराणी यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या व्यासपीठावर भाषण करत असताना केतन कासवाल या तरूणाने त्यांच्या दिशेने बांगड्या फेकल्या. या घटनेनंतर पोलिसांनी केतनला लगेचच ताब्यात घेतले. मात्र, या घटनेमुळे एकूणच देशभरात शेतकऱ्यांच्या मोदी सरकारविरोधातील रोष वाढत चालल्याचे चित्र आहे.
मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात स्मृती इराणी बोलत होत्या. यावेळी केतन कासवाल हा व्यासपीठापासून बऱ्याच दूर अंतरावर बसला होता. इराणी यांनी भाषणाला सुरूवात केल्यानंतर केतन अचानकपणे उठला. यावेळी त्याने इराणी यांच्या दिशेने दोन ते तीन बांगड्या फेकल्या. मात्र, केतन व्यासपीठापासून दूर असल्याने त्या इराणी यांच्यापर्यंत पोहचू शकल्या नाहीत. यावेळी केतन ‘वंदे मातरम’च्याही घोषणा देत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेविषयी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, केतन कासवाल शेतकरी असून त्याने कर्जमाफीच्या मागणीसाठी बांगड्या फेकून सरकारचा निषेध केला. कासवालचा काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही. बांगड्या फेकताना तो केवळ वंदे मातरमच्या घोषणा देत होता. मात्र, पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कासवाल याला घेऊन जात असताना स्मृती इराणी यांनी त्याला सोडून द्यायची विनंती केली होती. त्याला बांगड्या फेकू देत. मी याच बांगड्या त्याच्या बायकोला भेट देईन, असे इराणी यांनी म्हटले. यापूर्वी ओदिशात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्या वाहनांवर अंडी फेकली होती. केंद्रीय मंत्री सिंह हे अतिथीगृहाकडून जतानी येथे ‘सबका साथ, सबका विकास’ या कार्यक्रमासाठी जात होते. त्याचवेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच आंदोलन केले. सिंह यांच्या वाहनांच्या ताफ्याला त्यांनी काळे झेंडे दाखवले. तसेच काही कार्यकर्त्यांची त्यांच्या वाहनावर अंडी फेकली होती.
