देशातील ८१ लाख लोकांनी तंबाखू, सिगारेट सोडली!

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्वेनुसार (जीएटीएस) देशातील १५ ते २४ वयोगटातील तरुणांमधील तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात ६ टक्क्यांची घट झाली आहे. २००९-१० मध्ये हे प्रमाण १८.४ टक्के होते. ते २०१६-१७ मध्ये १२.४ टक्क्यांवर आले आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत तरुणांमध्ये जागृती निर्माण होत असून, ८१ लाख तरुणांची तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून मुक्तता झाली आहे. ही आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली. नड्डा यांना नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालक विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. तंबाखूजन्य पदार्थ्यांच्या सेवनावर नियंत्रण आणण्यासाठी केलेल्या भरीव कामगिरीबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तंबाखू सेवनावरील नियंत्रणासाठी ‘कॅच देम यंग’ हा माझा मंत्र आहे. तंबाखू सेवन करणाऱ्या १५ ते १७ वयोगटातील अल्पवयीनांच्या प्रमाणात ५४ टक्के, तर १८-२४ वयोगटातील तरुणांच्या प्रमाणात २८ टक्के घट झाली आहे. हे सांगण्यास मला अत्यंत आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया नड्डा यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिली.

तंबाखूजन्य पदार्थाच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण होत आहे. २०१६-१७ मध्ये देशातील ८१ लाख लोकांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाच्या विळख्यातून स्वतःची सुटका करून घेतली आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात जवळपास सहा टक्क्यांनी घट झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *