दादरची तशी वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. शिवसेना भवन, शिवाजी पार्क, शिवाजी नाट्य मंदिर, प्लाझा टॉकीज अशी अनेक महत्वाची ठिकाणं येथे आहेत जी दादरची ओळख स्पष्टपणे सांगत असतात. यामध्ये असलेलं एक महत्वाचं ठिकाण म्हणजे कबुतरखाना. दादर स्थानकातून पश्चिमेला बाहेर पडलो की पहिल्याच चौकात हा कबुतरखाना दिसतो. हा कबुतरखाना माहित नाही अशी व्यक्ती मुंबईत सापडणे कठीणच. मात्र दादरची ओळख असलेला हा कबुतरखाना कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना पत्र लिहून हा कबुतरखाना बंद करण्याची मागणी केली आहे. कबुतरांमुळे दादरमधील अनेक रहिवासी, विशेषतः लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिकांना श्वसनाचे विकार होत असल्याची तक्रार या पत्रातून करण्यात आली आहे. तसंच पक्ष्यांची विष्ठा आणि पिसांमुळे अनेक इमारतींच्या खिडक्या खराब झाल्याचंही पत्रात म्हटलं आहे.
