राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होत नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून संप सुरू केला आहे. बळीराजाने भाजीपाला व दुधाची विक्री बंद केली असून, शहरे व महानगरांकडे जाणारा शेतमालही सकाळपासून थांबवला जात आहे. बाजार समित्या व अनेक दूध संकलन केंद्रही संपामध्ये सहभागी झाले आहेत.
मात्र, शेतक-यांच्या या संपाला हिंसक वळण प्राप्त झालं आहे. आंदोलनाला सुरुवात करत काही ठिकाणी शेतक-यांनी वाहनांची तोडफोड सुरू केली आहे.
नाशिक :
निफाड तालुक्यातील नैताळे येथे शेतक-यांनी वाहनांच्या काचा फोडल्या. यामुळे पोलिसांना आंदोलक शेतक-यांवर सौम्य लाठीमार करावा लागला.
शेतकरी संपाला सुरुवात होताच बुधवारी रात्रीपासूनच शेतकऱ्यांनी नाशिक-सापुतारा, पिंपळगाव-सापुतारा, नाशिक-बलसाड या गुजरातला जोडणाऱ्या मार्गांवरुन होणारी भाजीपाला दूधफळे यांची वाहतूक अडवली. त्यानंतर आज सकाळपासून सुरू असलेली वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली असून ठिकठिकाणी भाजीपाला व दुधाचे ट्रक अडकून पडले आहेत.
दिंडोरी येथे नाशिक-सापुतारा रस्त्यावरील पालखेड चौफुलीवर शेकडो शेतकरी जमा होत त्यांनी येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली. यात दोन दुधाचे टँकर तर सात आठ आंब्याचे ट्रक अडवून ते बाजूला लावण्यास सांगितले. तर आंबे,चिक्कू, नारळ आदी विविध फळे विक्रीस जाणारे जप्त करत ते रस्त्यावर फेकण्यात आले.
रासेगाव, पांडणे, वणी,खेडगाव, पिंप्री अचला आदी ठिकाणी भाजीपाला,फळे , दुधाची वाहने रोखण्यात आली आहेत. लासलगाव येथे दूध टँकर थांबवणा-या 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सातारा :
बुधवारी (31 मे) रात्री साताऱ्यातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूरहून मुंबईकडे येणाऱ्या दुधाच्या गाड्या रोखल्या होत्या. एवढंच नाहीतर दुधवाहतूक करणाऱ्या ट्रकची तोडफोडही केली. त्यानंतर मध्यरात्री पुणे-बंगळुरू महामार्गावरही वाहनांची तोडफोड केली.