तीन महिलांचा २३ वर्षीय तरुणावर बलात्कार

दक्षिण आफ्रिकेत २३ वर्षीय तरुणावर तीन महिलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिन्ही महिलांनी त्या तरुणाला एका खोलीत डांबून ठेवून त्याच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत महिलांचा शोध सुरु केला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील पूर्व प्रीटोरिया भागात २३ वर्षीय तरुणाने शुक्रवारी प्रीटोरिया सीबीडी येथे जाण्यासाठी टॅक्सी पकडली होती. त्यावेळी टॅक्सीत आधीपासूनच तीन महिला होत्या. काही वेळाने टॅक्सीचालकाने गाडीचा मार्ग बदलला. मागे बसलेल्या एका महिलेने पीडित तरुणाला जबरदस्तीने गुंगीचे इंजेक्शन दिले. यानंतर पीडित तरुणाला एका खोलीत नेण्यात आले. तरुणाला शुद्ध आली तेव्हा एका खोलीत डांबून ठेवल्याचे त्याच्या लक्षात आले. ‘मला ते ठिकाण आठवत नाही, पण मी खूप घाबरलो होतो’ असे त्या तरुणाने पोलिसांना सांगितले. तिन्ही महिलांनी माझ्यावर तीन दिवस सातत्याने बलात्कार केला. मला झोप येऊ नये यासाठी मला वारंवार एनर्जी ड्रिंक दिले जात होते असे पीडित तरुणाने तक्रारीत म्हटले आहे.

तीन दिवसानंतर बलात्कार करणाऱ्या महिलांनी त्या तरुणाला बेनोनी भागातील निर्जनस्थळी सोडून दिले. अर्धनग्न अवस्थेतील त्या तरुणाला शुद्ध आल्यावर तो महामार्गावर आला आणि तिथे एका वाहनचालकाने त्याची मदत केली. या घटनेने पीडित तरुणाला मानसिक धक्का बसला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर दक्षिण आफ्रिकेत पुरुषांवर होणाऱ्या बलात्काराचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दक्षिण आफ्रिकेत दरवर्षी पुरुषांवर बलात्कार केल्याचे २० टक्के गुन्हे समोर येतात. प्रत्यक्षात अनेक पीडित पुरुष पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी जात नाही. पोलीस पुरुषांवरील बलात्काराचे गुन्हे गांभीर्याने घेत नाही असे पुरुषांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *