मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाशेजारी धाडसी चोरी

मुख्यमंत्र्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका डॉक्टरच्या घरात चोरटय़ांनी हात साफ केला. त्यामुळे पोलिसांची गस्त आणि सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चोवीस तास पोलीस बंदोबस्त आहे. तेथून घटनास्थळ केवळ शंभर मीटरवर आहे. पोलीस बंदोबस्त असताना परिसरात ही चोरी झाली, हे विशेष. मुख्यमंत्र्यांचे शेजारच असुरक्षित आहे, तर शहरवासीयांचे काय? असा सवाल नागरिक करीत आहेत.

धमरपेठ परिसरातील त्रिकोणी पार्क परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान आहे. मुख्यमंत्र्यांकडेच पोलीस दलाची धुरा असून त्यांच्या निवासस्थानी कडक सुरक्षा व्यवस्था असते. त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर डॉ. चंद्रकांत दिवाकर बिडकर हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांची पत्नी एका शाळेत प्राचार्य आहेत. तर मुलगा हा टाटा मोटर्स कंपनीत विपणन अधिकारी आहे. त्यांची सून पुण्याला राहात असून तिला मुलगा झाला आहे. डॉ. बिडकर हे आपल्या कुटुंबासह पुण्याला नातवाला बघण्यासाठी गेले होते. घराला कुलूप लागलेले होते. यादरम्यान त्यांचे भाऊ प्रकाश बिडकर रा. पांडे लेआऊट हे त्यांच्या घराकडे फेरफटका मारत असत. गुरुवारी बिडकर कुटुंबीय नागपुरात परत येणार असल्यामुळे त्यांनी मोलकरणीला भ्रमणध्वनीवरून घर स्वच्छ करण्यास सांगितले होते. त्यामुळे गुरुवारी सकाळी मोलकरीण घरी गेली असता दरवाजाचे कुलूप तुटलेले होते. तिने ताबडतोब घरमालकांना माहिती दिली. त्यांनी पोलिसांना कळविले. सहाय्यक निरीक्षक एल.आर. वाकडे, उपनिरीक्षक स्वप्निल चव्हाण हे कर्मचाऱ्यांसह तेथे पोहोचले. त्यांनी पंचनामा केला तेव्हा घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. आलमारीतील ८ हजार रुपये, सोन्याचे  दागिने असा ५० हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. मात्र, देवघरातील चांदीच्या वस्तू व ५ हजार रुपयांना चोरटय़ांनी स्पर्शही केला नाही, हे विशेष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *