उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे आलेल्या मुलाचा अपघाती मृत्यू

पिंपरी चिंचवड येथील नवी सांगवी परिसरात दुचाकी आणि मोटारीच्या अपघातात एका १६ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. काल (सोमवारी) सायंकाळी ६ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. ओम प्रवीण देशमुख असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळी सुट्टीसाठी ओम सोलापूरहून त्याच्या मामाकडे पिंपरी चिंचवडला आला होता. मात्र दुर्दैवाने त्याचा अपघातात मृत्यू झाला. एम एच १४ सी सी ७१८८ या मोटारीने ओमच्या एम एच २४ सी व्ही १५९३ या दुचाकीला नवी सांगवी येथील फेमस चौकात जोरात धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, यामध्ये ओमच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मोटार चालक शाहा गाडी घटनास्थळी सोडून फरार झाला आहे.

मोटार चालक शाहा याला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी संध्याकाळी उशिरा सांगवी पोलीस स्थानकात मोठ्या प्रमाणात लोक गोळा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी रात्री उशिरा फिर्याद नोंदवण्यात आली असून सांगवी पोलीस मोटार चालकाचा शोध घेत आहेत. उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी मामाकडे आलेल्या ओमवर काळाने झडप घातल्याने देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *