नवी मुंबईच्या ऐरोलीमधून आठ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण झाल्याने खळबळ उडाली आहे. फ्रान्शेला सोफिया फ्रान्सिस्को वाज असं या मुलीचं नाव आहे. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या शोधासाठी पोलिसांची 11 विशेष पथकं विविध भागात रवाना झाली आहेत. मात्र फ्रान्शेलाच्या मामाने याप्रकरणी मोलकरीण आणि सुतारावर संशय व्यक्त केला आहे.
फ्रान्शेलाचे वडील अंधेरीतील एका आयटी कंपनीत आहेत. मात्र काही कामानिमित्त ते परदेशी गेले आहेत.
लाल कारमधून अपहरण?
फ्रान्शेला काल नेहमीप्रमाणेच सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान स्कूल बसमधून आपल्या सोसायटीजवळ उतरल्याचं तिच्या मित्रांनी सांगितलं. मात्र फ्रान्शेलाला एका इसमाने लाल कारमधून घेऊन गेल्याचंही त्याच दहा वर्षीय मित्राने सांगितलं.
त्यामुळे फ्रान्शेला शोध सुरू आहे. ती अद्याप सापडलेली नाही.
गेटवर उतरली, पण घरी पोहोचलीच नाही
फ्रान्शेला ही न्यू होरायझन पब्लिक स्कूलमध्ये शिकते. ती नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर स्कूलबसमधून आली. आपल्या ऐरोलीतील सेक्टर 8 मधील ‘एकवीरा दर्शन सोसायटी’जवळ फ्रान्शेला उतरली. पण त्याचवेळी एका लाल कारमधून तिला कोणीतरी घेऊन गेलं. त्यामुळे ती घरी पोहोचलीच नाही. संध्याकाळी 6.15 च्या सुमारास ही घटना घडली.
मात्र रात्री सातपर्यंत फ्रान्शेला घरी न परतल्यामुळे, तिच्या आईने चौकशी सुरू केली. शाळेतही याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणेच फ्रान्शेला स्कूलबसमधून घरी गेल्याचं त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर फ्रान्शेलाच्या आईने स्कूलबस ड्रायव्हरकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनीही फ्रान्शेलाला घराच्या गेटजवळ सोडल्याचं सांगितलं.
यानंतर काही वेळातच परिसरात फ्रान्शेला बेपत्ता झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्याचवेळी शेजारीच राहणाऱ्या 10 वर्षाच्या मुलाने फ्रान्शेलाला कोणीतरी लाल कारमधून घेऊन गेल्याचं सांगितलं. याप्रकारामुळे हादरलेल्या फ्रान्शेलाच्या आईने थेट पोलिस स्टेशन गाठून अपहरणाची तक्रार दाखल केली.
सोसायटीमध्ये सीसीटीव्ही नाही
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणाच्या चौकशीसाठी तातडीने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. मात्र बेपत्ता मुलीच्या सोसायटीमध्ये सीसीटीव्ही नसल्याने, पोलिसांना तपासात अडथळे येत आहेत. आता त्या दहा वर्षांच्या मुलाच्या माहितीवरूनच पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
मोलकरीण आणि सुतारावर संशय
दरम्यान, फ्रान्शेलाच्या मामाने याप्रकरणी मोलकरीण आणि सुतारावर संशय व्यक्त केला आहे. मोलकरणीने दागिने चोरण्याचा प्रयत्न केल्यामुळे तिला आठ महिन्यांपूर्वीच काढून टाकलं होतं. त्यामुळे तीने बदल्याच्या भावनेतून हे कृत्य केलं असावं, असा अंदाज फ्रान्शेलाचे मामा साल्वोदर क्वॉड्रोस यांनी वर्तवला आहे.
याशिवाय घरातील किरकोळ कामासाठी तीन दिवस लावणाऱ्या सुतारावरही क्वॉड्रोस यांचा संशय आहे. एक छोटा स्क्रू बसवण्यासाठी या सुताराने आख्खा दिवस घेतला होता. त्यामुळे त्याच्यावर संशय आहे.

