पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एक अजब घटना समोर आली आहे. येथे एका कुत्र्याला चक्क फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण हे सत्य आहे. एका लहान मुलावर हल्ला केला म्हणून या कुत्र्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या हल्ल्यात लहानगा जखमी झाला होता.
पंजाब प्रांताचे सहायक आयुक्त रजा सलीम यांनी कुत्र्याला ही शिक्षा सुनावली. लहान मुलाच्या कुटुंबियांना कुत्र्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. या कुत्र्यावर जीवे मारण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. दुसरीकडे त्या कुत्र्याच्या मालकाने सुटकेसाठी आयुक्तांकडे अपिल केलं आहे. मुक्या प्राण्याला फाशीची शिक्षा देणं चुकीचं असून त्याला काही दिवसांसाठी तुरुंगात डांबावं पण फाशी देऊ नये अशी विनंती त्याने केली आहे.
आयुक्तांच्या आदेशानुसार येथे कुत्र्याला फासावर चढवण्याची शक्यता आहे असं झालं तर कुत्र्याला फाशी देण्याचा हा दुर्मिळ प्रकार असेल. पण कुत्र्याच्या मालकाने आपण आपल्या कुत्र्याला न्याय देण्यासाठी सर्व प्रयत्न करू असं म्हटलं आहे.