१००० कोटींच्या बेनामी संपत्ती प्रकरणी लालूप्रसाद यादव आयकर विभागाच्या ‘रडार’वर

बेनामी संपत्ती प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. यादव यांच्याशी संबंधित दिल्ली आणि गुडगावमधील २२ ठिकाणी आयकर विभागाने आज, मंगळवारी सकाळपासूनच छापेमारी सुरू केली आहे.

१००० कोटींच्या बेनामी संपत्तीप्रकरणी आयकर विभागाने लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित दिल्ली आणि गुडगावमधील २२ ठिकाणांवर छापे मारले. विशेष म्हणजे आयकर विभागाने सकाळी साडेआठपासून छापेमारी सुरू केली आहे. लालूप्रसाद यादव यांच्यासह खासदार प्रेमचंद गुप्ता यांच्या मुलांच्या घरांवरही छापे मारले. विशेष म्हणजे भाजपने नुकताच लालूप्रसाद आणि त्यांच्या मुलांचा बेनामी संपत्ती प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. तसेच चार दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही लालूप्रसाद यादव यांच्यावरील आरोपांची केंद्र सरकारने चौकशी करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली होती. तसेच लालूप्रसाद यांची कन्या आणि राज्यसभेच्या खासदार मिसा भारती यांनीही निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती जाहीर केली नाही, असा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात रेल्वेमंत्री असताना अनेक जमिनींचे व्यवहार झाल्याचेही आरोप त्यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *