राणी एलिझाबेथ यांना दूरून का होईना पण एकदा पाहण्याची आणि भेटण्याची इच्छा अनेकांना असेल. पण ती पूर्ण होण्यासाठी मात्र भाग्य असावं लागतं हेही तितकंच खरं. पण हा चार वर्षांचा भारतीय वंशाचा मुलगा मात्र या बाबातीत नशिबवान ठरला. राणीला प्रत्यक्षात भेटण्याची त्याची इच्छा काही पूर्ण झाली नाही, पण राणीने मात्र पत्र लिहून त्याचे कौतुक केलं आणि त्याला वाढदिवासाच्या शुभेच्छाही दिल्या. आता खुद्द इंग्लडच्या राणीचे राजमहालातून पत्र आलंय म्हटल्यावर या चिमुकल्याला किती आनंद झालाय हे वेगळं सांगायला नको.
शान दुले मुळचा इंग्लडचा. आपल्या आई वडील आणि भावासोबत तो सँडवेलमध्ये राहतो. शाळेत शिकताना त्याने राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याबद्दल खूप गोष्टी वाचल्या, ऐकल्या. दीर्घकाळ राजसत्तेवर असलेल्या या ९१ वर्षीय राणीबद्दल त्याच्या बालमनात कमालीची ओढ आणि आकर्षण होतं. राणीचा इतिहास, तिचा खमकेपणा, कठीण प्रसंगी तिने घेतलेल्या भूमिका त्याला एवढ्या आवडल्या की राणीला एकदा तरी भेटण्याची तीव्र इच्छा त्याला स्वस्थ बसू देईना. तेव्हा आईच्या मदतीने छोट्या शानने राणीला एक पत्र लिहिले. ‘मला तुमचा राजमुकूट आणि हातातलं लाल रंगाचं घड्याळ खूपच आवडतं, त्यात तुम्ही अगदी सुपरहिरोसारख्या दिसतात. मला तुमच्याशी गरीब मुलांबद्दल चर्चा करायची आहे. पण त्याचबरोबर मला घोडे आणि विमानाबद्दलही तुमच्याशी खूप खूप बोलायचे आहे’ असे पत्र शानने लिहिले. पुढच्या महिन्यात २५ तारखेला त्याचा वाढदिवस आहे तेव्हा राणीला आपल्या वाढदिवसाला येण्याचे आमंत्रणही त्याने पत्राद्वारे दिले. खरंतर मार्च महिन्यात शानने राणीला पत्र लिहिले होते. पण यावर कोणतेच उत्तर त्याला आले नाही.
कदाचित राणीपर्यंत आपले पत्र पोहोचले नसेल किंवा पत्र वाचायला तिच्याकडे वेळ नसेल असे वाटल्याने त्याचाही हिरमोड झाला. पण दोन महिन्यानंतर राणीची मोहोर उमटवलेलं पत्र बंकिंगहम पॅलेसमधून आलं आणि त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. ‘तुला गरीब मुलांबद्दल बोलायचं आहे हे एकून राणीला बरं वाटलं, त्याचप्रमाणे तुझी घोड्यांविषयीची आवड ऐकूनही राणीला खूप आनंद झाला. पण राणी खूपच व्यग्र असल्याने तुझं आमंत्रण त्या स्वीकारू शकत नाही. राणी स्वत: वाढदिवसाला येऊ शकल्या नाही तरी त्यांनी तुझ्यासाठी खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा पाठवल्या आहेत’ अशा आशयाचे ते पत्र होतं, राणी आपल्या वाढदिवसाला येऊ शकली नाही याचं थोडंसं दु:ख शानला झालं पण किमान राणीने आपलं पत्र वाचलं आणि त्याला उत्तर दिलं याचं खूप समाधान त्याला वाटलं.
