दिल्लीच्या तुघलकाबाद परिसरात शनिवारी सकाळी वायूगळती झाल्याचा प्रकार घडला. नजीकच्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना याची बाधा झाली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ५० विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तुघलकाबादच्या राणी झासी सर्वोदय कन्या विद्यालयाच्या परिसरात हा प्रकार घडला. शाळेच्या परिसरात असलेल्या एका कंटेनरमधून ही वायूगळती झाल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेच्या प्राचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत शाळेतील ५० जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलीस आणि कॅटस टीमने घटनास्थळाचा ताबा घेऊन मदतकार्याला सुरूवात केली आहे. शाळेच्या प्राचार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वायूगळती झाल्यानंतर सुरूवातीला विद्यार्थीनींना डोळ्यात आणि घशात जळजळ होण्याचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर तब्बल ५० ते ६० विद्यार्थीनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
