चक्क मेक्सिकन भाषेत आमीरच्या ‘थ्री इडियट्स’चा रिमेक

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या यशस्वी आणि सुपरहिट चित्रपटांच्या यादीतील एक चित्रपट म्हणजे ‘थ्री इडियट्स’. आठ वर्षांपुर्वी 2009 मध्ये आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई करत यशाचं नवं शिखर गाठलं होतं. चित्रपटाने अनेक जुने रेकॉर्ड पायदळी तुडवत नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले होते. आमीर खानने निभावलेली कॉलेज विद्यार्थ्याची भूमिका ते बोमन इराणींनी निभावलेला खडूस प्रिसिंपल…सर्व काही प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं होतं. शिक्षणव्यवस्थेवर बोट ठेवत मनमोकळं जगण्याचा संदेश देणा-या चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवलंही आणि भावनिकही केलं. आजही लोकांमध्ये चित्रपटाचं वेड कायम आहे. पण हे वेड फक्त भारतापुरतं मर्यादित नसून भारताबाहेरही पोहोचलं आहे.
‘थ्री इडियट्स’ चित्रपटाचा रिमेक केला जात आहे. पण हा रिमेक हिंदी किंवा इतर भारतीय भाषेत नसून चक्क मेक्सिकन भाषेत तयार करण्यात आला आहे. कार्लोस बोलाडो यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातही तीन मित्रांची कहाणी असून अल्फांजो दोसाल, क्रिस्चियन वाज्क्वेज आणि जर्मन वाल्देज मुख्य भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटातील करिना कपूरची भूमिका अभिनेत्री मार्था हाइगारेडाने निभावली आहे. या मेक्सिकन चित्रपटाचं नाव असणार आहे ‘3 idiotas’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *