नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर ३०० नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात कमांडर रघुवीर सिंह यांच्यासह २५ जवान शहीद झाले असून, सहा जवान अत्यवस्थ आहेत. जवानांनीही नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. घेरलं असतानाही जखमी अवस्थेत जवानांनी मुकाबला करत नक्षलवाद्यांच्या छातीत गोळ्या घालून त्यांना ठार केलं. यामधील एक जवान आहेत कॉन्स्टेबल शेर मोहम्मद. शेर मोहम्मद जखमी अवस्थेतही नक्षलवाद्यांवर तुटून पडले आणि त्यांना यमसदनी धाडलं. आपल्या मुलाचा आपल्याला गर्व असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या आईने दिली आहे. शेर मोहम्मद यांच्या गावक-यांसहित संपुर्ण देश जवानांसाठी प्रार्थना करत आहेत.
रुग्णालयात बोलताना शेर मोहम्मद यांनी सांगितलं की, ‘मी स्वत: दोन-तीन नक्षलवाद्यांच्या छातीत गोळी घातली. जे जवान जखमी झाले होते त्यांना खांद्यावर घेऊन रुग्णालय गाठलं. त्यानंतर आम्हाला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने येथे आणण्यात आलं. मला कमरेत आणि गुडघ्याला जखम झाली आहे’. शेर मोहम्मद यांनी सांगितलं की मशीन गन त्यांच्या कमरेला लागली असून त्यांमुळे त्यांना प्रचंड वेदना होता आहेत. ‘आपल्याला हल्ल्याची काहीच सूचना देण्यात आली नव्हती, फक्त रस्त्याचं काम पुर्ण करुन घ्यायचं आहे एवढंच सांगण्यात आलं होतं’, अशी माहिती शेर मोहम्मद यांनी दिली आहे.