श्रीनगरमध्ये रस्त्यावर शांतपणे चालत असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना मारहाण करणा-या नराधमांची ओळख पटली असून कारवाईला सुरुवात झाली आहे. जवानांवर हात उचलून त्यांच्या देशसेवेचा अपमान करणा-या काश्मिरी तरुणांना जेरबंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जवानांवर हात उचलणारे काश्मिरी तरुण बडगाम जिल्ह्यातील क्रालपोरा परिसरातील राहणारे आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी सीआरपीएफचे महासंचालक शुक्रवारी श्रीनगरला जाणार आहेत. दरम्यान गुरुवारी सीआरपीएफने केलेल्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला होता.
लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या श्रीनगरीमध्ये मतदानावेळी जोरदार हिंसाचार झाला होता. निवडणूक संपल्यानंतर एव्हीएम घेऊन परतणा-या जवानांना तरुणांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली होती. यासंबंधीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. मारहाण करणा-या तरुणांना जीवनाची अद्दल घडवा अशी मागणी अनेकजण करू लागले होते.
