पर्सनल व्हिडीओ लीक होण्याच्या भितीने तरुणीने केली आत्महत्या

दिल्ली विद्यापीठात शिकणा-या एका 21 वर्षीय तरुणीने रुप नगर येथील रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रियकराकडून तिला सातत्याने खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर लीक करण्याची धमकी मिळत असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. कॉमर्स शाखेत शिकणा-या या तरुणीने आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये मृत्यूसाठी प्रियकराला जबाबदार धरले आहे. तिने मॉडेल टाऊन पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराची तक्रारही दाखल केली होती. पण पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही असा आरोप तरुणीच्या कुटुंबियांनी केला आहे.
आरोपी वेद प्रकाश विरोधात पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बिहार पाटणा येथे राहणार असून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. ही मुलगी मूळची मध्यप्रदेशची असून शिक्षणासाठी म्हणून ती दिल्लीत आली होती. दिल्लीत आल्यानंतर ती वेद प्रकाशच्या प्रेमात पडली. दोघे लग्न करणार होते. तीनवर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. पण दोघांच्याही कुटुंबियांचा या नात्याला विरोध होता. कुटुंबियांशी नाते संबंध तोड आणि बिहारला निघून येण्यासाठी वेद प्रकाश तिच्यावर दबाव टाक होता. पण तिची कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याची इच्छा नव्हती अशी माहिती तपास अधिका-यांनी दिली.
आई-वडिलांचे घर सोडून ये अन्यथा खासगी क्षणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करीन अशी धमकी वेद प्रकाशने दिल्याचे तरुणीने चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. या तरुणीने जेव्हा लग्नासाठी  वेद प्रकाशकडे विचारणा सुरु केली तेव्हा त्याने तिचे कॉल घेणे बंद केले. तो तिला टाळू लागला. तुला लग्न करायचे असेल तर आई-वडिल आणि शिक्षण सोडून बिहारला येऊन रहावे लागेल असे त्याने सांगितले. जेव्हा तिने हा प्रस्वात अमान्य केला तेव्हा त्याने दोघांचे खासगी क्षणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करुन बदनामी करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *