पीडामुक्तीसाठी सहा वर्षांच्या मुलाचा नरबळी

उस्मानाबादमध्ये अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या अघोरी कारस्थानाला बळी पडून नात्यातीलच मुलाचा नरबळी देऊन खून केल्याची खळबळजनक आणि मन सुन्न करणारी घटना उघड झाली आहे. याप्रकरणी पाच जणांना गजाआड करण्यात यश आलंय.

26 जानेवारीला 6 वर्षांच्या कृष्णा इंगोले या बालकाचा कळंब तालुक्यातल्या डोळा पिंपळगावात खून झाल्याचं समोर आलं होतं. 26 जानेवारीला कृष्णा झेंडावंदनसाठी शाळेत गेला होता मात्र तो घरी परतलाच नाही. नातेवाईकांनी त्याची शोधाशोध केली असता घराशेजारच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. अत्यंत अघोरी पद्धतीनं कृष्णाचा खून केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालं होतं.

विशेष म्हणजे 26 जानेवारीला अमावस्या होती आणि कृष्णाचा खून ज्या पद्धतीनं झाला ते पाहता हा खून अंधश्रद्धेच्या प्रकारातून झाल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय होता. पोलिसांनी त्या दिशेनं तपास केला असता आरोपी हे मृत कृष्णा इंगोलेचे नातेवाईकच असल्याचं समोर आलं. पुण्यातील लखन उर्फ राहुल चुडावकर या तांत्रिक बाबाच्या सहाय्यानं कृष्णाचा नरबळी देऊन खून केल्याची खळबळजनक माहिती उघड झालीय.

घरातील महिलेचा मृत्यू झाला होता. तिचा आत्मा भटकत असल्यामुळे घरात समस्या आहेत. या समस्यांवर उपाय म्हणून या मृत महिलेची समाधी बांधून या समाधीच्या बांधकामावर मुलाचे रक्त टाकून नरबळी द्या, म्हणजे समस्या सुटेल असा दावा मांत्रिकानं केला होता.

या प्रकरणात उस्मानाबाद पोलिसांनी पुण्याच्या तंत्रिकासह एकूण 5 जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर खुनाबरोबरच जादूटोणा विरोधी कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *