बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचा एक फोटो काल सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोतील विनोद खन्ना यांची परिस्थिती पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले असेल याबाबत अजिबात शंका नाही. उंच, धिप्पाड असणारे विनोद आता आजाराने पुरते खंगलेत. त्यांची ही स्थिती पाहून अभिनेता इरफान खानलाही धक्का बसला.
इरफान खान आणि सबा कमर यांच्या ‘हिंदी मीडियम’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा काल पार पडला. त्यावेळी इरफानने विनोद यांचा फोटो पाहिल्याचे सांगत त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त केली. इरफान म्हणाला, विनोदजींची प्रकृती लवकरात लवकर सुधारायला हवी. ते केवळ एक उत्कृष्ट अभिनेताच नाही तर चांगले व्यक्तीदेखील आहेत. त्यांची तब्येत लवकर ठीक व्हायला हवी, त्यासाठी मला अवयवदान करावयास लागले तरी चालेल. या इंडस्ट्रीमध्ये मी विनोद खन्ना आणि धरम पाजी यांच्याकडे आयडॉल म्हणून पाहतो. आज सकाळी मी त्यांचा फोटो पाहिला. त्यांना इतकं अशक्त झालेलं पाहून मला धक्काच बसला. यावेळी भावनिक झालेल्या इरफानने तो विनोद यांचा मोठा चाहता असल्याचेही सांगितले. विनोद खन्ना यांची भूमिका असलेले ‘खून पैसा’ आणि ‘मेरा गाव मेरा देश’ हे त्याचे आवडते चित्रपट आहेत.
दरम्यान, आता विनोद खन्ना यांची तब्येत बरी असल्याची माहिती त्यांचा मुलगा राहुल खन्ना याने दिली. रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी त्यांची खूप चांगली काळजी घेतली. त्यामुळेच त्यांच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होत असल्याने लवकरच त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल, असे राहुल म्हणाला.
आपल्या करिअरची सुरुवात खलनायक म्हणून करणाऱ्या विनोद मेहरा यांनी नंतर ‘हिरो’ म्हणूनच अनेकांच्या मनावर आपली छाप पाडली. ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
