– रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलेली कुस्तीपटू साक्षी मलिक विवाहबंधनात अडकली आहे. २ एप्रिल रोजी साक्षीचा विवाहसोहळा पार पडला आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सत्यव्रत कादियानसोबत साक्षी विवाहबंधनात अडकली आहे. रोहतकजवळील नांदल गावात साक्षी मलिकचा विवाहसोहळा पार पडला. साक्षी मलिकने पारंपारिक वधूप्रमाणे पेहराव केला होता. या क्षणी तिचे चाहते तसंच अनेक स्टार्सनी भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
साक्षी मलिकला शुभेच्छा देणा-यांमध्ये भारताचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागदेखील होता. आता विरेंद्र सेहवाग शुभेच्छा देणार म्हणजे सरळ शब्दांमध्ये देणार नाही एवढं नक्की. विरेंद्र सेहवागने ट्विटरच्या माध्यमातून लग्नाच्या शुभेच्छा देताना मिश्किल अंदाजात साक्षीला आता कुस्ती न करण्याचा सल्लाही देऊन टाकला. ‘साक्षी तुला सुखी वैवाहिक आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा. आयपीएल कॅम्पमुळे तुझ्या लग्नात सहभागी नाही होऊ शकलो. आनंददायी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि हो आता घरात कुस्ती नको’, असं ट्विट विरेंद्र सेहवागने केलं आहे.