भारतीय वंशाच्या महिलेची जर्मनीत निर्वस्त्र तपासणी

जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळावर भारतीय वंशाच्या महिलेला सुरक्षा रक्षकांनी तपासणीसाठी कपडे काढायला सांगितल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधीत महिलेने विमानतळ प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवली असून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील या घटनेप्रकरणी अहवाल मागवला आहे.

श्रुती बसप्पा यांनी फेसबुकवर आपल्यावर गुदरलेला प्रसंग वर्णन केला आहे.

तीस वर्षीय श्रुती यांनी आइसलँडच्या तरुणाशी लग्न केले असून या दाम्पत्याला ४ वषार्ची मुलगीदेखील आहे. श्रृती या २९ मार्च रोजी आइसलँडला जात होत्या. त्यांचे विमान फ्रँकफर्टमार्गे आइसलँडला जाणार होते. मात्र फ्रँकफर्ट विमानतळावर त्यांना कटू अनुभवाचा सामना करावा लागला.

विमानतळावर महिला सुरक्षा रक्षकांनी श्रुती यांना अडवले. बॉडी स्कॅनरमधून गेल्यानंतरही त्यांना एका खोलीत नेण्यात आले. तिथे महिला सुरक्षा रक्षकांनी त्यांना कपडे काढायला सांगितले. श्रुती यांनी यावर आक्षेप घेतला. सुदैवाने श्रुती यांचे पती तिथे आले. श्रृती यांच्या पतीने हस्तक्षेप केल्यावर महिला सुरक्षारक्षकांनी त्यांना सोडले.

वर्णद्वेषातून हा प्रकार झाला असून महिलांची तपासणी करण्याची ही नवी पद्धत आहे का असा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला आहे. श्रुती यांची पोस्ट समोर येताच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी जर्मनीतील भारतीय दुतावासाकडून अहवालही मागवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *