पेंग्विन दर्शन मोफतच!

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात पेंग्विन दर्शनासाठी शुल्क आकारणीचा निर्णय होईपर्यंत तरी पर्यटकांसह मुंबईकरांना पेंग्विनचे दर्शन मोफतच ठेवण्यात येणार आहे. ३१ मार्चपर्यंत रोजी पेंग्विन दर्शन मोफत होते; आणि १ एप्रिलपासून मुलांना ५० आणि मोठ्यांना १०० रुपये आकारण्यात येणार होते. परंतु पेंग्विन दर्शनासाठी शुल्क आकरण्यावरून महापालिकेत मतमतांतरे आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना पेंग्विन पाहण्यासाठी १०० रुपये शुल्क आकारण्याच्या प्रस्तावाविरोधात आहे. शिवाय उर्वरित सदस्यांनीही पेंग्विन पाहण्यासाठी शुल्क आकारू नये, अशा आशयाची मागणी केली आहे. परिणामी, महापालिका पेंग्विन दर्शनाबाबत नेमकी काय भूमिका घेते? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (भायखळा) येथील हम्बोल्ट पेंग्विन कक्ष, अंतर्गत बगिचे व प्रवेश प्लाझाचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली १७ मार्च रोजी करण्यात आले.

दोन लाख पर्यटक पेंग्विन भेटीला

पेंग्विन दर्शनासाठी दर आकारण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला नाही. परिणामी, पेंग्विनचे दर्शन मोफतच घेता येणार आहे. मागील दोन आठवड्यांपासून पेंग्विन पाहण्यासाठीच्या गर्दीत भर पडत आहे. त्यामुळे पेंग्विन दर्शनासाठी शुल्क निश्चित करण्यावर महापालिका ठाम आहे.

सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत प्रशासनाने दर आकारण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र महापालिका निवडणुकीपूर्वी हे महागात पडेल, याची जाणीव असल्याने शिवसेनेने विरोध केला होता. या दरवाढीबाबत अद्याप कळविण्यात आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *