चंद्रपूर, लातूर आणि परभणी महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, १९ एप्रिलला मतदान होणार आहे. २१ एप्रिलला निकाल जाहीर करण्यात येईल.
या महापालिकांच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने ५ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी या महापालिका निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज रविवार, २ एप्रिललादेखील स्वीकारण्यात येतील. २८ मार्च रोजी गुढीपाडव्याची सुटी असल्याने त्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. सांगली- मीरज- कुपवाड महानरपालिकेतील प्रभाग क्र .२२ ब, जळगाव महापालिकेतील प्रभाग क्र .२४ अ आणि कल्याण- डोंबिवली महापालिकेतील प्रभाग ४६ च्या रिक्तपदासाठीदेखील १९ एप्रिलला मतदान होणार आहे. या शिवाय, धुळे जिल्हा परिषदेच्या शिरूड (ता. धुळे) आणिअकोला जिल्हा परिषदेच्या दानापूर (ता. तेल्हारा) निवडणूक विभागाच्या; तर अकोट (जि. अकोला) पंचायत समितीच्या कुटासा निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठीदेखील १९ एप्रिललाच मतदान होईल