शाहरुखचा मन्नत बंगला पुन्हा वादाच्या भोव-यात

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मन्नत बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मन्नत बंगल्याच्या जागेच्या भाडेकरारामधील अटी-शर्थीचे उल्लंघन केल्याचा ठपका शाहरुख खानवर ठेवण्यात आला असून, या प्रकरणी शाहरुखला कोट्यवधींचा दंड ठोठावण्याची शक्यता आहे.

मन्नत बंगल्याची जागा ही शासनाची असून, ती भाडेतत्त्वावर शाहरुखने वास्तव्याला घेतली होती. मात्र या भाडेकरारातल्या अटी-शर्थींचं भंग झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे शाहरुखकडून कोट्यवधी रुपयांचा दंड आकारला जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणी अंधेरीतील तहसीलदार कार्यालय आणि एच वॉर्डाचा अहवालही मागवण्यात आला असून, दोन्ही अहवालांची तपासणी झाल्यावर पुढे काय कारवाई करावी हे ठरणार आहे.

शाहरुख खाननं अटी-शर्थींचे उल्लंघन केल्यामुळे शाहरुख खानवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर केलेलं बेकायदेशीर बांधकाम तोडण्यासाठी आलेला खर्च मुंबई महापालिकेने वसूल केला होता. त्यावेळी शाहरुखकडून 1 लाख 93 हजार 784 रुपयांचा दंड पालिकेने वसूल केला होता. शाहरुखच्या मन्नत या बंगल्याबाहेर व्हॅनिटी वॅन पार्क करण्यासाठी त्याने रॅम्प बांधला होता. या रॅम्पमुळे सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवताना अडथळे येत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली होती.

या तक्रारीनंतर महापालिका आयुक्तांनी 6 फेब्रुवारी 2015 रोजी शाहरुखला नोटीस बजावली होती. नोटीसची मुदत उलटून गेल्यानंतर 15 फेब्रुवारी 2015 रोजी एच. के. भाभा रोड आणि माऊंट मेरी रोडच्या जंक्शनवर असलेला हा रॅम्प पालिकेने तोडून टाकला होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *