अकोल्यातील गांधी रोडवरील आरआरसी कॉम्प्लेक्समधे असलेल्या झी महासेलच्या दुकानाला भीषण आग लागली. या भीषण आगीत दुकान पूर्णपणे जळून खाक झाले आहे. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना असून फायर ब्रिगेडच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. फायर ब्रिगेडच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, घटनास्थळ अतिशय वर्दीळचं असून आग आटोक्यात न आल्यास मोठी हानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कॉम्प्लेक्समध्ये प्रसिद्धी माध्यमांचीही कार्यालयं आहेत. या कार्यालयांतील संगणक व यंत्र साहित्यही अग्नितांडवात भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती मिळत आहे. शिवाय, आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.