जवान आणि त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करण्यासाठी लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना कामाला लावण्यात आले आहे. त्याशिवाय काही मानसोपचार तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येणार असल्याचे भामरे म्हणाले. आजकाल मोबाइलमुळे घरच्यांशी संपर्क साधता येत असल्यानेही जवानांना तणावाचा सामना करावा लागत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

जवानांच्या आत्महत्येसंदर्भात शुक्रवारी लोकसभेत एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, देशात १०१ जवान, १९ हवाई दलातील कर्मचारी आणि नौदलातील ५ जवानांनी गेल्या वर्षी आत्महत्या केली आहे. त्याशिवाय लष्करातील ३ जवानांची हत्या केल्याचेही उघड झाले आहे.
यावर्षी लष्करातील १३ जवानांनी आत्महत्या केली आहे. हवाई दलातील २ जवानांनीही आत्महत्या केल्याचेही आढळून आले आहे. ताणतणावामुळे जवानांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येते. जवानांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने बरीच पावले उचलली आहेत. त्यात जवानांचे राहणीमान, राहण्याची जागा आणि त्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा समावेश आहे. त्याशिवाय त्यांना तणावमुक्त करण्यासाठी रोज योगा आणि मेडिटेशनचाही समावेश करण्यात आल्याचे भामरे यांनी सांगितले.