पुणे-सोलापूर रस्त्यावर शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हल्स आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात मुंबईतील ११ प्रवाशांचा मृत्यू झाला. हे सर्व प्रवासी मुंबईतील मुलुंड भागातील होते, अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. मृतांमध्ये एका लहान मुलासह पाच पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. मृत पावलेले सर्व जण खासगी ट्रॅव्हलच्या मिनी बसमधून देवदर्शनासाठी निघाले होते. त्यावेळीच हा अपघात झाला.
मुलुंडहून अक्कलकोटला जात असलेल्या ट्रॅव्हलच्या बससमोर रानडुक्कर अचानक आडवे आल्यामुळे वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगाने असणारी ही ट्रॅव्हल बस दुभाजक ओलांडून समोरुन येणाऱ्या ट्रकला धडकली. उरुळी कांचनाजवळच्या इमामदार वस्तीजवळ सकाळी साडेचारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. दरम्यान, अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेचा आधिक तपास उरुळी कांचन पोलिस करित आहे.
मृत्यांची नावे- विजय काळे, ज्योती काळे, योगेश लोखंडे,जयवंत चव्हाण, योगिता चव्हाण, रेवती चव्हाण, जगदीश पंडित, शैलजा पंडित, प्रदीप अवचट, सुलभा अवचट.
