उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या स्फोटामागे आयसिसचा हात असल्याचा दावा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे. बॉम्ब पेरल्यानंतर संशयित दहशतवाद्यांनी त्याचे छायाचित्र सीरियात पाठवले होते असे चौहान यांनी म्हटले असून याचे पुरावेदेखील आमच्या हाती लागले असल्याचे चौहान यांनी सांगितले.
मंगळवारी मध्यप्रदेशमध्ये भोपाळ – उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात १० जण जखमी झाले होते. या स्फोटाचे लागेबंधे आयसिस या दहशतवादी संघटनेशी जोडले असल्याची शक्यता आधीपासूनच वर्तवली जात होती. मंगळवारी सकाळी कालपिपल स्थानकाजवळ पॅसेंजर ट्रेनच्या सर्वसाधारण डब्यात स्फोट झाला होता. बॅगेत पाईप बॉम्बद्वारे हा स्फोट घडवण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
मध्यप्रदेशमधील पिपरियामधून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीने ट्रेनमधील स्फोटात वापरण्यात आलेल्या बॉम्बचे छायाचित्र सीरियात पाठवल्याचे समोर आले आहे. भोपाळमधून आलेल्या तीन जणांनी हा स्फोट घडवल्याचा सांगितले जात आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार स्फोटात अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला आहे. इराक आणि सीरियात क्रूरकृत्यांनी दहशत निर्माण करणा-या आयसिसने पहिल्यांदाच भारतात बॉम्बस्फोट घडवला आहे. अमोनियम नायट्रेटचा वापर फक्त मोठ्या दहशतवादी संघटनांतर्फेच केला जातो याकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
भोपाळ – उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये स्फोट झाल्यानंतर देशभरातील राज्यांमधील गुप्तचर यंत्रणाही कामाला लागल्या आहेत. तेलंगणा पोलिसांनी स्फोटानंतर मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. या माहितीच्या आधारे मध्यप्रदेश पोलिसांना तीन जणांना पकडण्यात यश आले. तर लखनऊच्या वेशीवरील असलेल्या ‘हाजी कॉलनी’ नामक दाट वस्तीतील एका घरात मध्य प्रदेशातील स्फोटाशी संबंधित दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.
