मेदांता हॉस्पिटलच्या एअर अँब्युलन्सला आग लागून ते बँकॉकजवळ कोसळल्याने पायलट मृत्यूमुखी पडला असून इतर चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी यासंबंधी काल रात्री ट्विट करून माहिती दिली असून लष्कराच्या हेलिकॉप्टर्सच्या सहाय्याने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
नवी दिल्ली येथून बँकॉकला जाणारे हे विमान काल दुपारी इंधन भरण्यासाठी कोलकाता येथे काही काळ थांबले होते, त्यानंतर विमानाने बँकॉकच्या दिशेने उड्डाण केले असता त्याला आग लागली व ते नखोन पॅथम विमानतळाजवळ कोसळले. यावेली विमानात पाच प्रवासी होते, त्यापैकी पायलटचा मृत्यू झाला असून इतरांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दरम्यान मेदांता रुग्णालयाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नरेश त्रेहान यांनी या दुर्दैवी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
