संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणा-या सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील गर्भपात रॅकेटचा प्रमुख सूत्रधार डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याला मंगळवारी रात्री उशिरा बेळगाव येथून अटक करण्यात आली. सांगली पोलिसांची पाच तपास पथक संपूर्ण राज्यात खिद्रापुरेचा शोध घेत होती. अखेर त्याला बेळगावमधून अटक करण्यात आली.
मणेराजुरी (ता. मिरज) येथील स्वाती प्रवीण जमदाडे (वय २५) या विवाहितेच्या मृत्यूनंतर रविवारी सांगली पोलिसांनी या अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश केला. बीएचएमएसची पदवी असलेल्या खिद्रापुरेने म्हैसाळमध्ये रुग्णालय सुरू केले होते. पण प्रत्यक्षात तो येथे अवैध गर्भपात करायचा.
म्हैसाळच्या ओढ्यालगत गर्भपात करून दफन केलेले १९ भ्रूण पोलिसांना रविवारी सापडले. डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेच्या अटकेनंतर यापेक्षा आणखी धक्कादायक माहिती समोर येऊ शकते. स्वाती प्रवीण जमदाडे (वय २५) या विवाहितेचा डॉ. खिद्रापुरे याने गर्भपात केला होता. त्यावेळी स्वातीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तिचा पती व डॉ. खिद्रापुरे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. याचा तपास करताना पोलिसांना, खिद्रापुरे याचा गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदा गर्भपाताचा हा उद्योग सुरू असल्याची माहिती मिळाली.
