विनोदी लेखक तारक मेहता यांचे निधन

तारक मेहता यांना २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या लेखनामध्ये नेहमीच नव्या पिढीच्या विचारांचे प्रतिबिंब पाहायला मिळाले. ‘तारक मेहकता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील चंपकलाल गडा, जेठाभाई, दयाबेन यांसारख्या पात्रांना अजरामर करण्यामागे तारक मेहता यांच्या लेखणीचा मोठा हात आहे.

‘दुनियाने उंधा चष्मा’ या सदरासाठी आणि अनोख्या लेखनशैलीसाठी तारक मेहता ओळखले जायचे. गुजराती रंगभूमीसाठी तारक मेहता यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. विनोदी लेखनशैलीच्या मदतीने तारक मेहता यांच्या लेखनाने अनेकांचीच मने जिंकली. त्यांचे ‘नवूं आकाश नवी धरती’ आणि ‘कोथळामांथी खिलाडी’ ही गुजराती भाषेतील पुस्तकेही खूप गाजली.  १९७१ पासून चित्रलेखा गुजराती साप्ताहिकातून ‘दुनियाने उंधा चष्मा’ हे त्यांचे लोकप्रिय सदर प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली होती. तेव्हापासूनच तारक मेहता यांनी दैनंदिन जीवनातील बऱ्याच प्रसंगांवर आणि महत्त्वाच्या घटनांवर त्यांच्या लेखणीद्वारे वेगळ्या दृष्टीकोनाने पाहत एक नवा पायंडा पाडला होता.

‘सब’ वाहिनीने २००८ मध्ये तारक मेहता यांच्या लोकप्रिय सदरावर आधारित एका मालिकेची सुरुवात केली होती. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेद्वारे एक वेगळीच दुनिया आणि तारक मेहता यांच्या लेखणीतून साकारलेले कलाकार प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. फार थोड्या वेळातच तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने अनेकांची पसंती मिळवली. त्यामुळे या मालिकेच्या रुपाने तारक मेहता नेहमीच आठवणींच्या स्वरुपात सर्वांसोबत असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *