शहरातील म्हसरूळ परिसरातील सुमारे साडेसहाशे मतदारांची नावे मतदार याद्यांमधून गायब झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सर्व नागरिकांनी एकत्र येऊन संबंधित मतदान केंद्राच्या आवारात जमून निवडणूक आयोगासह महापालिका व जिल्हा प्रशासनाचा निषेध नोंदविला. त्याचप्रमाणे मतदान केंद्राध्यक्षांना जाब विचारला. यावेळी केंद्रावरील मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण होत असल्याचे बघून पोलिसांनी मध्यस्ती करुन नागरिकांची समजूत काढली; मात्र नागरिकांनी साडेसहाशे मतदारांना राष्ट्रीय कर्तव्यापासून परावृत्त ठेवल्याचा आरोप प्रशासनावर केला आहे. लोकशाहीचा हक्क बजावता आला नसल्याने नागरिकांनी संतप्त होऊन प्रशासनाच्या गलथान कारभाराविरुध्द तीव्र नाराजी दर्शविली आहे. सदर प्रकार केंद्रावरील अधिकाऱ्यांनी निवडणूक मदत कक्षाला कळविला असून याबाबत चौकशी केली जात आहे.
