गर्भवती पत्नी, मुलाचा खून करून आत्महत्या

 

 लोणंद गावाच्या हद्दीत इंदिरानगर वसाहतीत अडीच वर्षांच्या मुलासह गर्भवती पत्नीचा खून करून पतीनेही आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या घटनेमागचे कारण समजू शकले नाही.

 इंदिरानगर, लोणंद (ता. खंडाळा) येथे राहणारे संदीप चंद्रकांत कोळेकर (वय ३५) गर्भवती पत्नी रेखा (३०)व अडीच वर्षांचा मुलगा आदेशसह राहत होते. संदीप कोळेकर हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होते. रविवारी रात्री त्यांनी पत्नी रेखा व मुलगा आदेशचा गळा दाबून खून करून संदीप यांनी हाताच्या नसा कापून व गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारपासून कोळेकर यांचे घर बंद होते. घरातील दूरदर्शचा आवाज मोठा करण्यात आला होता.
शेजारणीने बराच वेळ घराचा दरवाजा बंद असल्याने हाक मारली. कोणीच दरवाजा उघडला नाही. त्यामुळे रात्री त्यांनी घराच्या फटीतून बघितले असता त्यांना फरशीवर रेखा कोळेकर या बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरडा करून शेजारच्यांना बोलावले. त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता हा प्रकार उघडकीस आला.
संदीप कोळेकर यांनी पत्नी व मुलाचा खून करून नंतर आत्महत्या केली असावी. कोणालाहीआवाज येऊ नये म्हणून दूरदर्शनचा आवाज मोठा केला असावा असे पोलिसांनी सांगितले. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप भोसले करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *