आई कामावर गेल्यानंतर बाप करायचा मुलींवर बलात्कार

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. कृष्णानगरमधील इंद्रापुरी परिसरात राहणा-या एका व्यक्तीवर स्वतःच्या पोटच्या मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आशा ज्योती केंद्रामध्ये मुलींचे समुपदेशन केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपी पिताला ताब्यात घेतले आहे.
आशा ज्योती केंद्रातील काउंसलर अर्चना सिंह आणि पोलीस अधिकारी मालती सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी खासगी कंपनीत कामाला आहे. ती नोकरीवर गेल्यानंतर आरोपी दारू पिऊन घरी यायचा आणि यानंतर मोठ्या मुलीवर (वय 15 वर्ष) लैंगिक अत्याचार करायचा. मुलीने विरोध केला तर तिला मारहाण करायचा आणि जीवे मारण्याची धमकीही द्यायचा.
नराधम बाप गेल्या 5 महिन्यांपासून मोठ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी आरोपीने दारूच्या नशेत छोट्या मुलीवर बलात्कार केला. हे पाहिल्यानंतर मोठ्या मुलीचा इतक्या दिवसांचा संयम तुटला आणि तिने नराधम बापाच्या कुकृत्याची माहिती आईला दिली.
धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर पीडित मुलींच्या आईचे नराधम पतीसोबत भांडण झाले. कृष्णानगर पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी सुजीत द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीनं विरोध केल्यानंतर आरोपीने तिलाही जीवे मारण्याची धमकी दिली.
त्याचा जाचातून कसातरी स्वतःचा जीव वाचवत महिलेनं पतीविरोधात पोलिसात आणि आशा ज्योती केंद्रात तक्रार दाखल केली. प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन आशा ज्योती केंद्र आणि पोलिसांनी तातडीने पीडित मुलींचे समुपदेशन केले. घडलेला सर्व प्रकार दोघींनी संस्थेकडे सांगितला. यानंतर तपासणीसाठी मुलींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. अहवाल आल्यानंतर कृष्णानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरोधात कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *