लाओसमध्ये होणा-या आशिया रग्बी सेव्हन्स स्पर्धेसाठी भारताच्या महिला संघाचे नेतृत्व नेहा परदेशीकडे सोपवण्यात आले आहे. तिच्यासह वाहबिझ भरुचा आणि रुची शेट्टी या महाराष्ट्राच्या रग्बीपटूंचा संघात समावेश आहे. अन्य रग्बीपटूंमध्ये ओदिशाचे सर्वाधिक सहा तसेच महाराष्ट्रासह दिल्लीच्या प्रत्येकी तिघींचा समावेश आहे.
सोशियाते जनरले पुरस्कृत भारताच्या बारा सदस्यीय संघात नेहा, वाहबिझ आणि रुचीसह प्रिया बन्सल, नमिता भोज आणि नेहा एस. (तिघीही नवी दिल्ली) तसेच हुपी माझी, लक्ष्मीप्रिया साहू, मीरारानी हेरंब, संजुक्ता मुंडा, भाग्यलक्ष्मी बरीक आणि शुभलक्ष्मी बरीकचा (सर्व ओदिशा) समावेश आहे. महिला संघाचे प्रशिक्षक नासीर हुसेन असून सहप्रशिक्षक म्हणून रेहमुद्दिन शेख असतील.
१७ ते १८ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत व्हिएंटिएनमध्ये (लाओस) होणा-या आशिया रग्बी सेव्हन्स स्पर्धेत भारतासह नेपाळ, दक्षिण कोरिया, फिलीपीन्स, मलेशिया, पाकिस्तान आणि यजमान लाओस असे सात संघ नशीब अजमावतील.
दुबईत (संयुक्त अरब अमिराती) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या आशियाई रग्बी (१८ वर्षाखालील) स्पर्धेत भारताच्या मुलींनी कांस्यपदक मिळवले होते. त्यामुळे भारताच्या आशिया सेव्हन्स रग्बी स्पर्धेत भारताच्या पदकाच्या आशा उंचावल्या आहे.
भारताचा संघ आशिया सेव्हन्स स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास रग्बी इंडियाचे महासचिव महेश मथाई यांनी व्यक्त केला आहे.