निश्चलनीकरणानंतर चलनात आणलेल्या २००० रुपयांची बनावट नोट छापता येऊ नये, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने त्यात अधिकाधिक फिचर्स असले तरी याही नोटेची बनावट प्रत बाजारात आल्याचे निष्पन्न झाले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने २००० रुपयांच्या तब्बल तीन बनावट नोटा जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे या नोटांची छपाई अत्यंत उच्च दर्जाची आहे. त्यामुळे खरी आणि खोटी नोट यामधील फरकही ओळखणे अत्यंत अवघड असल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नाव न उघड करण्याच्या अटींवर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आल्यानंतर त्याची कॉपी करून बनावट नोटा चलनात आणण्याचे प्रयत्न याआधीही करण्यात आले. देशात विविध ठिकाणी या प्रकरणी १२ गुन्हे दाखल झाले आहेत. पण त्या नोटा या केवळ मूळ नोटेची स्कॅन कॉपी होती. त्यामुळे खरी आणि खोटी नोट ओळखणे हे सहज शक्य होत होते. पण मंगळवारी आमच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये पकडलेल्या तीन नोटा या आधीच्या नोटांपेक्षा निश्चितच वेगळ्या आहेत. त्यांचा दर्जा उच्च आहे. त्यामुळे बनावट आणि खरी नोट यातील फरक ओळखणे अवघड जाणार आहे.
बनावट नोटांचा व्यवहार करणाऱ्या आणि गेल्या काही महिन्यांपासून फरार असलेल्या उमर फारूक याला एनआयएच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. काल फारूक २००० रुपयांच्या तीन बनावट नोटा घेऊन दुसऱ्या व्यक्तीकडे निघाला होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून २००० रुपयांच्या तीन बनावट नोटा जप्त केल्या.
या तिन्ही बनावट नोटा न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे अधिक तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. २००० रुपयांच्या नव्या नोटातील सुरक्षेचे किती फिचर्स बनावट नोटांमध्ये आणण्यात आरोपींना यश आले आहे, याचीही तपासणी सुरू आहे. पण सध्या तरी या बनावट नोटांचा दर्जा उच्च असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यापू्र्वी पश्चिम बंगालमध्ये भारत-बांगलादेशच्या सीमेवरून २००० रुपयांच्या ४० बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.