जन्मदात्या आईनेच घेतला २१ दिवसांच्या मुलीचा जीव

पुरोगामी महाराष्ट्रातही मुलगी नको म्हणून जन्मदात्या आईनेच २१ दिवसांच्या मुलीची पवईत निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मीना बबलू जयस्वाल (२३) असे निर्दयी आईचे नाव असून, तिला मुलीच्या हत्येप्रकरणी पवई पोलिसांनी अटक केली आहे.

मूळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेले बबलू जयस्वाल हे पवईतील मिलिंदनगरमध्ये राहत होते. चार वर्षांपूर्वी त्यांचा मीनासोबत विवाह झाला. त्यांना दोन वर्षांची मुलगी आहे. ते गारमेंटमध्ये काम करतात. तर मीना गृहिणी आहे. पहिली मुलगी झाली म्हणून ती नाराज होती. दुसऱ्या वेळी तरी वंशाचा दिवा म्हणून मुलगा व्हावा अशी अपेक्षा तिला होती; आणि मुलगाच होणार या आनंदात असताना दुसरीही मुलगी झाली. तिचा जन्म झाल्यापासून तिने तिच्याकडे दुर्लक्ष केले. ती सतत आजारी असल्याने रडत असल्यामुळे ती वैतागली होती. ७ फेब्रुवारी रोजीही तिचे रडणे काही थांबत नव्हते. याच रागात तिने तिचे नाक-तोंड दाबून तिचे डोके आपटून तिची हत्या केली.

सायंकाळी ५च्या सुमारास पती कामावरून घरी आला. तेव्हा मीनाने काहीही झाले नसल्याचा आव आणला. पण मुलगी काहीच हालचाल करीत नसल्याने त्याने तिला राजावाडी रुग्णालयात नेले. मीनानेही रडण्याचे नाटक सुरू केले. तेथे दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले.

मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. ८ फेब्रुवारी रोजी तिच्या शवविच्छेदनाच्या अहवालानुसार नाक-तोंड दाबून डोके आपटून तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पवई पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी.के. महाडेश्वर यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घातले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. तपासात सुरुवातीला बबलू आणि मीनाकडे पोलिसांनी चौकशी केली. मिळालेल्या माहितीत संशयाची सुई मीनाकडे वळताच पोलिसांनी शुक्रवारी मीनाला पुन्हा ताब्यात घेतले. तिला पोलिसी खाक्या दाखवताच तिने हत्येची कबुली दिली आणि वरिल घटनाक्रम सांगितला. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. के. महाडेश्वर यांनी दिली. शनिवारी तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *