मुंबईच्या शॉना पंड्या घेणार अवकाशात भरारी

कल्पना चावला आणि सुनीता विलियम्स यांच्यानंतर आता भारतीय वंशाच्या तिसऱ्या महिला डॉ. शॉना पंड्या या पुढील वर्षी अंतराळात जाणार आहेत. ३२ वर्षांच्या शॉना या न्यूरोसर्जन असून सध्या त्या कॅनाडातील अल्बर्टा विद्यापीठाच्या रूग्णालयात कार्यरत असून अंतराळात जाण्यासाठी तयारीही करत आहेत. मुळच्या मुंबईतील असलेल्या शॉना या पुढील वर्षी म्हणजे २०१८ मध्ये अंतराळात जाणाऱ्या मिशनचा एक हिस्सा असतील. या मिशनमध्ये एकूण आठ लोक आहेत.

सिटिझन सायन्स अॅस्ट्रोनॉट (सीएसए) कार्यक्रमांतर्गत अवकाशात जाण्यासाठी ३२०० लोकांमधून दोघांची निवड झाली. यात शॉना यांचा समावेश आहे. शॉना यांचे आई-वडील मुंबईतच राहतात. सध्या शॉना या मुंबईत आल्या आहेत. मंगळवारी त्यांनी वैद्यकीय विद्यार्थी, डॉक्टर्स आणि शालेय विद्यार्थ्यांबरोबर चर्चा केली.
मला अंतराळवीर बनायचे होते. पण वैद्यकीय क्षेत्रावर माझे प्रेम आहे, असे शॉना यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. शॉना या फक्त अंतराळवीर किंवा डॉक्टर नसून त्या चांगल्या ओपेरा गायक, लेखक आणि तायक्वांदो चॅम्पियन देखील आहेत. शॉना आणि त्यांची टीम अंतराळात बायो मेडिसीन आणि मेडिकल सायन्सचे प्रयोग करणार आहेत. तेथील वातावरणात होत असलेल्या बदलाचा अभ्यासही केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *