दारुच्या नशेत बायकोला पेटवले; आई आणि मुलाला ठेचून मारले

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे गुरूवारी पहाटे काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना घडली. येथील कोरफळे परिसरात राहणाऱ्या अनुराथ बरडे या इसमाने आपल्या आई, पत्नी आणि मुलाची निर्घृण हत्या केली. अनुराथ बरडे याला दारूचे व्यसन असून त्याच नशेत त्याने हे कृत्य केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आज पहाटेच्या सुमारास अनुराथ बरडे याने त्याची आई सखुबाई बरडे आणि मुलगा सुदर्शन बरडे यांना दगडाने ठेचून मारले. त्यानंतर अनुराथने त्याची पत्नी रेश्मा बरडे हिलाही पेटवून दिले. पत्नीला पेटवून दिल्यानंतर अनुराथने स्वत:च्या चार वर्षांच्या मुलीवरही वार करून तिला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेजाऱ्यांनी अडवल्यामुळे तिचा जीव वाचला. मात्र, या मुलीची प्रकृती गंभीर आहे.

या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अनुरथला ताब्यात घेतले आहे. अनुरथला दारूचे प्रचंड व्यसन होते. याच नशेत त्याने कुटुंबाला संपविल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, अनुरथने सुरूवातील आई आणि मुलाला मारल्यानंतर पत्नीला पेटवून दिले. उपचारासाठी उस्मानाबाद येथे नेत असताना तिचा मृत्यू झाला. तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीवर बार्शीतील जगदाळे मामा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या या हत्येमागचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी अनुरथची चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *